राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी; लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा


लोणी काळभोर, ता. ९ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे घडली. या प्रकरणी संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यासह १० ते १२ जणांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्मशानभूमीजवळ गाडी अडवून हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, विकास लवांडे हे दशक्रीया कार्यक्रमासाठी आळंदी म्हातोबाची येथे आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते परत निघाले असताना स्मशानभूमीजवळ त्यांच्या चारचाकी गाडीला हायरायडर व दोन बलेनो गाड्यांनी अडविले.

त्यानंतर काही जणांनी लवांडे यांना गाडीतून बाहेर ओढत त्यांच्यावर काळी शाई फेकली. तसेच शिवीगाळ करत धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

‘पिस्तुलाने संपवून टाकू’

“आमच्या गुरुच्या अपमानाचा बदला घेणार, तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत दोन पिस्तुले दाखविल्याचा आरोपही लवांडे यांनी केला आहे. या घटनेत त्यांचे चालक संतोष गडदे यांनाही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

१४ जणांविरोधात गुन्हा

याप्रकरणी विकास लवांडे (रा. शिंदेवस्ती, आष्टापूर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यासह १० ते १२ जणांविरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘जीवाला धोका’ : लवांडे

घटनेनंतर बोलताना विकास लवांडे म्हणाले, “वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरांची नावे जाहीर केल्यापासून मला धमक्या येत आहेत. माझ्या जीवाला धोका असून पोलिसांनी संरक्षण द्यावे. आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार आहे.”

संग्राम भंडारे यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, संग्राम भंडारे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत पिस्तूल दाखवल्याचा आरोप फेटाळला आहे. “गुरुवर्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ काळी शाई फेकली. मात्र पिस्तूल दाखविले नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.

पोलिसांची पथके रवाना

घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपायुक्त सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.


0
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!