By, Avishkar Fule
पुणे, : गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने वारजे परिसरातील एका लॉजवर धाड टाकून वेश्याव्यवसायातून एका अल्पवयीन पीडितेसह एका महिलेची सुटका केली. या प्रकरणी एका महिला आरोपीला अटक करण्यात आली असून वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना साई एक्झिक्युटिव्ह लॉजिंग अँड बोर्डिंग, मुंबई-बंगळुरू महामार्ग, वारजे येथे महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने माहितीची पडताळणी केली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री करून लॉजवर अचानक छापा टाकण्यात आला.
या कारवाईत लॉजमध्ये आणलेल्या एका अल्पवयीन पीडितेची आणि एका महिलेची सुटका करण्यात आली. तसेच आश्लेषा सचिन सोमनकर (वय ३४, रा. वारजे, पुणे, मूळ रा. माहिम, मुंबई) हिला अटक करण्यात आली.
या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३ तसेच अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील कलम ४ व ५ आणि पॉक्सो कायदा कलम ४ व १७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्यासह पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, बबनराव केदार, दत्ताराम जाधव, किशोर भुजबळ, अविनाश कोंडे, वैशाली खेडेकर आणि वैशाली इंगळे यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन पीडितेला पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संरक्षणासाठी संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.







