By, Avishkar Fule
देहूरोड : देहूरोड परिसरातील घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावत देहूरोड पोलिसांनी अट्टल घरफोड्या चोराला अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेले सोने-चांदीचे सर्व दागिने जप्त करण्यात आले असून गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
देहूरोड मेन बाजार परिसरातील गोयल निवास, फ्लॅट क्रमांक २ येथे २ जून रोजी सायंकाळी ४.३० ते ३ जून रोजी सकाळी ६ या कालावधीत घरफोडीची घटना घडली होती. घर बंद असताना अज्ञात चोरट्याने कडी-कोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करून सुमारे ५२ ग्रॅम सोन्याचे आणि २,२५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार देहूरोड पोलिसांनी दोन विशेष तपास पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान घटनास्थळाजवळ भगव्या रंगाची ऑटोरिक्षा आढळून आली. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या रिक्षेचा माग काढत देहूगाव येथील वैकुंठ मंदिर परिसरात सापळा रचला. तेथे एमएच १४ जेपी ०२९५ क्रमांकाच्या रिक्षेत आलेल्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्याने आपले नाव विक्रमसिंग विठ्ठलसिंग ठाकुर (वय ३७, रा. मुक्तीधामसमोर, देहूगाव) असे सांगितले. त्याच्या रिक्षेत लोखंडी कटावणी आढळून आली. अधिक चौकशी केली असता त्याने गोयल निवास येथील घरफोडीची कबुली दिली.
पोलिस तपासात विक्रमसिंग ठाकुर हा अट्टल घरफोड्या चोर असून त्याच्याविरुद्ध निगडी, भोसरी, चिखली, वाकड आणि इतर पोलिस ठाण्यांत घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता चोरीतील सोने-चांदीचे सर्व दागिने जप्त करण्यात आले. त्यामुळे गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
आरोपीने आणखी काही घरफोड्या केल्या आहेत का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अक्षय जाधव, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे, पोलीस हवालदार किरण खेडकर, पोलीस हवालदार बाळासाहेब विधाते, पोलीस अंमलदार प्रशांत माळी, केतन कानगुडे, पंकज भदाणे, अमोल माने, शुभम बावणकर आणि मोमीन शेख यांनी ही उल्लेखनीय कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.







