बालिका अत्याचार-खून प्रकरण : ३५ साक्षीदारांच्या साक्षी, आरोपी अडचणीत


By, Avishkar Fule

पुणे – नसरापूर (ता. भोर) येथील साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार व खून प्रकरणातील खटल्याची सुनावणी विशेष न्यायालयात सुरू असून, आतापर्यंत तीन अल्पवयीन मुलांसह एकूण ३५ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षदर्शी साक्षी, वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, डीएनए विश्लेषण आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सरकार पक्षाने आरोपीविरुद्ध भक्कम बाजू न्यायालयासमोर मांडली आहे.

या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला गुन्हा दाखल झाल्याच दिवशी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर अवघ्या १४ दिवसांत सुमारे १,१०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २९ मेपासून पुरावा नोंदविण्याचे काम सुरू झाले.

सरकार पक्षातर्फे फिर्यादी, तिचे कुटुंबीय तसेच आरोपीला बालिकेसोबत घटनास्थळाकडे जाताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. आरोपी बालिकेला घटनास्थळाकडे घेऊन जात असल्याचे दिसणारे सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित तांत्रिक पुरावेही न्यायालयासमोर सादर करण्यात आले.

खटल्यातील तीन अल्पवयीन मुलांच्या साक्षींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मुलांनी न्यायालयात निर्भीडपणे साक्ष देताना आरोपी बालिकेला घटनास्थळाकडे घेऊन जात असल्याचे तसेच बंद शेडमध्ये पलंगावर तिच्यासोबत बसलेला असल्याचे पाहिल्याचे सांगितले. बालिकेला मदत करण्याच्या उद्देशाने शेडवर दगड मारल्याचाही उल्लेख त्यांनी साक्षीत केला. आरोपीच्या ओळख परेडीतही या मुलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

तपासात आरोपीने बालिकेला गाठी शेव देण्याचे आणि गाईचे वासरू दाखविण्याचे आमिष दाखवून घटनास्थळी नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गाठी शेव खरेदी केलेल्या ठिकाणच्या साक्षीदारांचीदेखील साक्ष नोंदविण्यात आली.

शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सविस्तर साक्ष, संबंधित व्हिडिओग्राफी तसेच आरोपी लैंगिक कृत्य करण्यास सक्षम असून त्याची मानसिक स्थिती सामान्य असल्याचे वैद्यकीय अहवाल विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयासमोर सादर केले.

याशिवाय, घटनास्थळ परिसरात बालिकेच्या ओरडण्याचा आवाज आणि शेडवर दगड मारल्याचा आवाज ऐकणाऱ्या साक्षीदारांच्या साक्षीही नोंदविण्यात आल्या आहेत. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे अहवाल, डीएनए विश्लेषण आणि अन्य तांत्रिक पुरावे सादर करण्यात आले असून, नियंत्रण नमुन्यांच्या आधारे करण्यात आलेल्या डीएनए तपासणीत आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होत असल्याचा दावा सरकार पक्षाने केला आहे.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!