By, सुनिल घनवट
मंचर, ता. १५ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील मंचर बाह्यवळणाजवळील हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) उजव्या कालव्यात ढकलण्यात आलेल्या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह तब्बल १८ तासांच्या शोधमोहिमेनंतर सोमवारी सकाळी आढळून आला. या प्रकरणी मंचर पोलिसांनी संशयित रमेश कडाळे याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नाली पोपट भांगरे (वय २०, सध्या रा. शितकल वस्ती, मंचर; मूळ रा. वाघदरी-कोतूळ, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) हिला रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रमेश कडाळे (रा. खिलारवाडी, ता. जुन्नर) याने कालव्यात ढकलल्याचा आरोप आहे.
याबाबत स्वप्नालीचे वडील पोपट चिंधू भांगरे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपीने अज्ञात कारणावरून स्वप्नालीसोबत झटापट केली. त्यानंतर तिला जबरदस्तीने ओढत नेत वाहत्या पाण्यात ढकलून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ आरडाओरडा करून बचावकार्य सुरू केले. आपत्ती व्यवस्थापन पथक, स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबविली. अखेर सोमवारी सकाळी स्वप्नालीचा मृतदेह शोधण्यात यश आले.
या घटनेप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रमेश कडाळे याला अटक करण्यात आली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन मंचर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत.








