प्रतिनिधी ; अविष्कार फुले
पुणे, ता. ९ : मुंढवा परिसरातील केशवनगर येथील कचरा डेपोजवळ आढळलेल्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ने केला असून, पैशांच्या वादातून तरुणीचा गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. गोरखनाथ देवराव शिंदे (वय ४४, रा. चंदननगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफरीन सलीम पठाण (वय २९, रा. वडगाव शेरी) हिचा मृतदेह केशवनगर, मुंढवा येथील कचरा डेपोजवळ आढळून आला होता. याप्रकरणी तिची बहीण अरबीना सुरज सय्यद यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ चे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. तपासादरम्यान गोरखनाथ शिंदे याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिस तपासात उघड झाले की, आरोपी आणि मृत आफरीन पठाण यांची सुमारे वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. त्यातून त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. दरम्यान, आफरीन हिने आरोपीकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. ५ मे रोजी रात्री दोघे खराडी बायपास येथे भेटले. त्यानंतर आरोपीच्या मारुती स्विफ्ट डिझायर (एमएच १२ डब्ल्यूएक्स ६५०४) कारमधून ते मांजरी खुर्द परिसरात गेले.
त्या ठिकाणी पैशांच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाला. आरोपीने ५० हजार रुपये आणले होते; मात्र आफरीन हिने एक लाख रुपयांवर ठाम भूमिका घेत आरोपीला त्यांच्या संबंधांची माहिती कुटुंबीयांना देण्याची धमकी दिली. यामुळे संतप्त झालेल्या गोरखनाथ शिंदे याने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह कारमधून केशवनगर येथील निर्जन ठिकाणी नेऊन टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले.
प्रथमदर्शनी अपघाती मृत्यू वाटणाऱ्या या प्रकरणाचा गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने तपास करून अवघ्या काही दिवसांत उलगडा केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके व राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. बी. बेरड, पोलीस हवालदार परेश सावंत, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर, विनायक येवले, संदीप येळे, पांडुरंग नानेकर, प्रफुल्ल मोरे तसेच चालक पोलीस हवालदार सुरेश जाधव यांचा सहभाग होता.








