प्रतिनिधी : मंगेश काळभोर
पुणे, ता. ११ : फुरसुंगी परिसरातील एका ३५ वर्षीय व्यक्तीची टेलिग्राम ग्रुप व बनावट वेबसाईटच्या माध्यमातून तब्बल ११ लाख १७ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते १३ मार्च २०२४ या कालावधीत अज्ञात मोबाईल धारकांनी फिर्यादीशी संपर्क साधला. आरोपींनी फिर्यादीला ‘M21 Group Task DHDS’ या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करून विविध ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखविले. तसेच ‘mgbwnfmi.top’ या वेबसाईटवर नोंदणी करण्यास भाग पाडले.
यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगून आरोपींनी वेळोवेळी रक्कम ट्रान्सफर करून घेतली. यात फिर्यादीची एकूण ११ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९४/२०२६ अन्वये भारतीय दंड विधान कलम ४१९, ४२०, ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल धारक, लिंकधारक, बँक खातेधारक व संबंधित वापरकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.








