किरकोळ धक्क्याच्या वादातून तरुणाची हत्या उरुळी कांचनच्या दोघांसह तिघांना अटक; यवत पोलिसांची कारवाई


By, Hanumant Survase

यवत, ता. दौंड : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ३९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना सोमवारी (दि. ११) सायंकाळी सहजपूर (ता. दौंड) येथे घडली. याप्रकरणी यवत पोलिसांनी उरुळी कांचन येथील दोघांसह तिघांना अटक केली आहे.

धनराज शिवाजी भुरके (वय ३९, रा. अंबुलगा मेन, ता. निलंगा, जि. लातूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. माऊली पांडुरंग जाधव, विशाल मारुती धेंडे (दोघे रा. उरुळी कांचन, ता. हवेली) आणि नवाज रियाज तांबोळी (रा. यवत, ता. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत दयानंद विश्वनाथ भुरके यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज भुरके हे त्यांच्या चुलत्यासह आणि मित्रासोबत सहजपूर फाटा येथील ‘ओअसीस’ हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण सुरू असताना धनराज हे बाथरूमकडे जात असताना शेजारच्या टेबलावर बसलेल्या काही व्यक्तींना त्यांचा नकळत धक्का लागला. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपींनी धनराज भुरके यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हॉटेलमधील खुर्चीने त्यांच्या डोक्यावर आणि शरीरावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी तातडीने कारवाई करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) व ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!