लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई चंदन चोरी प्रकरणातील सात जणांवर मोक्का; मुख्य आरोपीसह टोळीवर संघटित गुन्हेगारीचा ठपका


By, Avishkar Fule

लोणी काळभोर, ता. २२ : थेऊर परिसरातील पुनावाला स्टड फार्म येथील चंदन चोरी प्रकरणात लोणीकाळभोर पोलिसांनी मोठी कारवाई करत सात अट्टल गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास थेऊर येथील पुनावाला स्टड फार्ममध्ये सात चोरट्यांनी घुसून सुरक्षा रक्षकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सुमारे ८० हजार रुपये किमतीची चार चंदनाची झाडे तोडून त्यांचे ओंडके जबरदस्तीने चोरी करून नेले होते.

याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ३०९ (६), ३१० (२), ३११ तसेच आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी रमेश बाबू करडे (रा. केडगाव), शाम तानाजी साळुंके, संतोष आण्णा शिवरकर, विशाल अनिल दामोदरे, फिरोज कचरू सय्यद आणि पिंटू ऊर्फ लक्ष्मण भिमा गायकवाड यांना अटक केली. तर अमोल जाधव हा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

तपासात मुख्य आरोपी रमेश करडे याने इतर आरोपींसह संघटित टोळी तयार करून वारंवार गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास अपर पोलिस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) यांनी २१ मे रोजी मंजुरी दिल्यानंतर संबंधित कलमांचा समावेश करण्यात आला.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, तत्कालीन पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उपायुक्त सागर कवडे आणि सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलिस हवालदार आण्णा माने, सागर जगदाळे, निलेश कोल्हे, वैजिनाथ शेलार, विलास शिंदे, सुरज कुंभार तसेच पोलिस अंमलदार सचिन सोनवणे, प्रविण दडस, अशोक गिरी, नितेश पुंडे, गणेश खरात आणि प्रशांत नरसाळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.


20
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!