By, Avishkar Fule
लोणी काळभोर, ता. २८ : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत बारावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी ही लोणी काळभोर परिसरातील एका शैक्षणिक संकुलात बारावीचे शिक्षण घेत आहे. सहावी ते आठवीदरम्यान दोघे एकाच शाळेत शिकत होते. त्यानंतर संपर्क तुटला होता. मे २०२५ मध्ये उन्हाळी क्लासदरम्यान आरोपी मुलाने विद्यार्थिनीशी मोबाईलवर संपर्क साधला. “तुझे काही फोटो माझ्याकडे आहेत,” असे सांगत त्याने तिला भेटण्यासाठी बोलावले.
सुरुवातीला विद्यार्थिनीने दुर्लक्ष केले. मात्र, फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने ती घाबरली व त्याला भेटली. आरोपीने तिला शेवाळवाडी, हडपसर येथील एका लॉजवर नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवत तसेच फोटो व्हायरल करण्याची भीती घालून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. त्यानंतरही आरोपीकडून वारंवार अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपी मुलगा सतत फोन व संदेश करून भेटण्यासाठी दबाव टाकत होता. “घडलेला प्रकार घरी सांगीन,” अशी धमकी देत तो संपर्क ठेवत होता. मुलगी वारंवार फोनवर बोलत असल्याने आईला संशय आला. तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी पीडितेच्या ३९ वर्षीय आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १७ वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.








