By, Avishkar Fule
उरुळी कांचन, ता. 30 : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमेश राजेंद्र अवचर (वय 32) यांच्या मृत्यूबाबत विषारी दारू प्राशनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. मात्र, या वृत्तांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश अवचर यांचे शवविच्छेदन ससून सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा मृत्यू विषारी दारू प्राशनामुळे झाल्याचे निष्पन्न झालेले नाही.
दरम्यान, चौकशी व पूर्वीचे वैद्यकीय अहवाल तपासल्यानंतर मृत व्यक्तीचे यकृत (लिव्हर) व स्वादुपिंड (पॅन्क्रियाज) पूर्वीपासूनच बाधित असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर वेळोवेळी वैद्यकीय उपचार सुरू होते. तसेच त्याला अतिमद्यपानाचे व्यसन असल्याची माहितीही पोलिस तपासात पुढे आली आहे.
या पार्श्वभूमीवर उमेश अवचर यांचा मृत्यू विषारी दारू प्राशनामुळेच झाला, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अंतिम वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भात नागरिकांनी व प्रसारमाध्यमांनी अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन उरुळी कांचन पोलिसांकडून करण्यात आले आहे.








