By, Avishkar Fule
लोणी काळभोर, ता. ३१ : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील अत्यंत सामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील कु. आरती रविंद्र सकट हिने जिद्द, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मुंबई पोलीस दलात निवड मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पोलीस भरती प्रक्रियेत तिने १५० पैकी १२४ गुण मिळवत नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
आरतीने दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले असून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने यशाचे शिखर गाठले आहे. तिच्या या यशामुळे लोणी काळभोरसह

पंचक्रोशीतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आरतीचे वडील आणि आई हे दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर लहान भाऊ टायरच्या दुकानात काम करतो. आरतीने हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर तिने एका रुग्णालयातील स्वागतकक्षात नोकरी करत कुटुंबाला आर्थिक आधार दिला. त्याचबरोबर २०२३ पासून पोलीस भरतीची तयारीही सुरू ठेवली.
वनविभागाच्या जागेतील पत्र्याच्या खोलीत राहणाऱ्या या कुटुंबाने आर्थिक अडचणी असूनही मुलीच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही. कुटुंबाच्या कष्टाला आणि आरतीच्या जिद्दीला अखेर यशाचे फळ मिळाले.
विशेष म्हणजे, कोणत्याही अकॅडमीचे मार्गदर्शन न घेता आरतीने स्वतःच्या अभ्यासाच्या बळावर यश मिळवले. मैदानावरील सरावासाठी मोहम्मद शेख यांचे मार्गदर्शन लाभले. रुग्णालयातील कामाच्या वेळेत मिळालेल्या मोकळ्या वेळेचा उपयोग करून तिने अभ्यास केला. ज्ञान, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने मुंबई पोलीस दलात स्थान मिळवले.
आरतीच्या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून, तिच्या चिकाटीचे आणि आई-वडिलांच्या त्यागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“देशसेवेचे स्वप्न साकार झाले”
“देशप्रेम आणि अथक मेहनतीच्या जोरावर पोलीस दलात जाण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले. या यशामागे आई-वडील आणि भावाची साथ व विश्वास हेच माझे खरे बळ ठरले. हे यश अंतिम नसून, भविष्यात स्पर्धा परीक्षा देऊन पोलीस निरीक्षक पदावर विराजमान होण्याचा माझा निर्धार आहे.”
— आरती रविंद्र सकट








