श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून खुले; ऑनलाईन नोंदणीद्वारे दररोज १ हजार भाविकांना दर्शन


By, अपुर्वा धायबर

मंचर, ता. २ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे गेल्या पावणे पाच महिन्यांपासून दर्शनासाठी बंद असलेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर सोमवार (ता. १५) पासून भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. मंदिरात दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी व्यवस्था सुरू करण्यात आली असून दररोज एक हजार भाविकांनाच दर्शनाची संधी दिली जाणार आहे.

नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर परिसरात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. नवीन सभामंडप, दर्शनबारी, पायरी मार्ग तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम सुरू असल्याने ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. या बंद कालावधीस ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

मंदिरासमोरील भव्य सभामंडप, दर्शनबारी, परिसर स्वच्छता, गर्दी व्यवस्थापन आणि भाविक सुविधांशी संबंधित उर्वरित कामे १५ जूनपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गजानन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जूनपासून मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. १५ ते ३० जून या कालावधीत दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत दर्शन व्यवस्था उपलब्ध राहील. ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार असून दररोज एक हजार भाविकांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी वैध ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक राहणार आहे. तसेच मंदिर प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विकासकामांमुळे भविष्यात भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.

दृष्टिक्षेप

  • १५ जूनपासून भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले

  • ५ जूनपासून ऑनलाईन नोंदणी सुरू

  • दररोज १ हजार भाविकांना दर्शनाची संधी

  • सकाळी ७ ते ११ या वेळेत दर्शन व्यवस्था

  • सभामंडप, दर्शनबारी व पायरी मार्गाची कामे अंतिम टप्प्यात

  • वैध ओळखपत्र बंधनकारक

  • २०२७ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना गती


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!