By, हनुमंत सुरवसे
लोणी काळभोर, ता. २ : पुणे शहर पोलीस दलातील प्रशासकीय फेरबदलांतर्गत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे (गुन्हे) पोलीस निरीक्षक प्रदीप नागनाथ पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासंदर्भातील आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी (ता. २) जारी केले. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ अन्वये पोलीस आस्थापना मंडळ (शहर) यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार या तात्पुरत्या पदस्थापना करण्यात आल्या आहेत.
आयुक्तालयाच्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी नव्या नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने हजर होऊन कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्याबाबतचा अनुपालन अहवाल पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
राजेंद्र पन्हाळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच विविध गुन्ह्यांच्या तपासात सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या बदलीनंतर आता प्रदीप पवार यांच्याकडे ठाण्याची धुरा सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, गुन्हे शाखेतील अनुभवाच्या बळावर प्रदीप पवार यांच्याकडून परिसरातील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्याबरोबरच गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या नियुक्तीकडे नागरिकांसह पोलीस दलाचेही लक्ष लागले आहे.








