By, भारत गायकवाड
नागपूर, प्रतिनिधी : ‘नीट’ परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि फेरपरीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पांढराबोडी परिसरातील अजयनगर येथे उघडकीस आली. स्नेहा ऊर्फ आकांक्षा कृष्णकुमार चतुर्वेदी (चौबे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, तिच्या अभ्यासाच्या टेबलवर सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये ‘पुन्हा नीट परीक्षा देण्याची हिम्मत नाही’ असे नमूद असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहा ही वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगून नागपुरातील एका कोचिंग संस्थेतून ‘नीट’ परीक्षेची तयारी करत होती. ३ मे रोजी झालेल्या परीक्षेनंतर तिला ६५० हून अधिक गुण मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या बातम्यांमुळे ती मानसिक तणावाखाली गेल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
२० मे रोजी दुपारी तिची आई नीलम यांनी तिला जेवणासाठी बोलावले असता, तिने खोलीतच राहण्याचे सांगितले. बराच वेळ ती बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. त्यावेळी तिचा धाकटा भाऊ राजा (१२) याने खिडकीतून पाहिले असता स्नेहाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये स्नेहाने पहिल्या परीक्षेत चांगले गुण मिळण्याची अपेक्षा असल्याचे नमूद करत पुन्हा परीक्षा देण्याची मानसिक तयारी नसल्याचे लिहिले होते. तसेच तिने आई-वडिलांची माफीही मागितल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
शिक्षणासाठी घेतले होते लाखोंचे कर्ज
स्नेहाचे वडील कृष्णकुमार चतुर्वेदी हे अल्पभूधारक शेतकरी असून नागपुरात आचारी म्हणूनही काम करत होते. मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी किसान क्रेडिट कार्डद्वारे सुमारे तीन लाखांचे कर्ज घेतले होते. तसेच मध्यप्रदेशातील शेती आणि नागपुरातील घर गहाण ठेवले होते. या आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांवर वाढलेल्या ओझ्याची जाणीव स्नेहाला होती. त्यातूनही ती तणावाखाली गेल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
या घटनेची दखल घेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून विद्यार्थ्यांवर वाढत असलेल्या मानसिक तणावाचा मुद्दा उपस्थित केला. ‘नीट’ परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.








