By, Avishkar Fule
लोणी काळभोर, ता. ५ (प्रतिनिधी) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) वारंवार नोटिसा आणि आदेशांकडे दुर्लक्ष करून अनधिकृत बांधकाम सुरू ठेवल्याप्रकरणी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील उद्योजक हेमंत हाडके यांच्याविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पूर्व हवेली परिसरातील इतर अनधिकृत बांधकामांवरही कारवाई होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
PMRDAच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन व निष्कासन विभागातील शाखा अभियंता प्रणव दिलीप डेंगळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ५४ अन्वये हेमंत हाडके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती येथील गट क्रमांक ४७७ मधील बांधकामाबाबत अशोक दिनकर खोले यांनी PMRDAकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर २७ मार्च २०२६ रोजी अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली असता संबंधित ठिकाणी बांधकाम सुरू असल्याचे आढळून आले.
यानंतर PMRDAने ६ एप्रिल २०२६ रोजी संबंधितांना बांधकाम तात्काळ थांबविण्याची नोटीस बजावली होती. आवश्यक परवानग्या प्राप्त होईपर्यंत कोणतेही पुढील बांधकाम करू नये, असे निर्देश देण्यात आले होते. आदेशाचे पालन न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला होता.
मात्र नोटीस आणि सुनावणी प्रक्रिया सुरू असतानाही बांधकाम सुरूच ठेवण्यात आल्याचे PMRDAच्या निदर्शनास आले. तसेच आवश्यक कागदपत्रेही सादर करण्यात आली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
PMRDAचे पदनिर्देशित अधिकारी तथा तहसीलदार रविंद्र रांजणे यांच्या आदेशानुसार या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. २७ मार्च ते २ जून २०२६ या कालावधीत प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत संबंधित विकासकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्व हवेलीतील बांधकामांकडे लक्ष
कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि पूर्व हवेली परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्याची चर्चा आहे. एका विकासकावर कारवाई झाल्यानंतर इतर कथित अनधिकृत प्रकल्पांवरही PMRDA कारवाईचा बडगा उगारणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
PMRDAचा इशारा
अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. नोटीस बजावल्यानंतरही बांधकाम सुरू ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा PMRDAने दिला असून, यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. PMRDAची पुढील भूमिका काय असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.








