By, राहुल बुट्टे
चाकण, ता. ६ : चाकण-तळेगाव मार्गावरील खालुंब्रे येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात न नेता शिक्रापूरजवळ रस्त्यावर टाकून पसार झालेल्या वाहनचालकाला उत्तर महाळुंगे पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. या घटनेमुळे माणुसकी हरवल्याची भावना व्यक्त होत असून परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज कुमार रामजी विश्वकर्मा (वय ३५, रा. खालुंब्रे, ता. खेड) हे गुरुवारी (ता. ४) सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास चाकण-तळेगाव मार्गावरील एचपी पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलांडत असताना एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.
धडक दिल्यानंतर वाहनचालकाने जखमी मनोज विश्वकर्मा यांना स्वतःच्या वाहनात घेतले. मात्र त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्याऐवजी आरोपीने शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला टाकून दिले आणि तेथून पलायन केले.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध
अपघातानंतर उत्तर महाळुंगे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून एमएच-१२-झेडई-०७७९ क्रमांकाची जीप अपघातात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.
तपास पथकाने वाहनाचा माग काढत चालकाचा शोध घेतला आणि अवघ्या ४८ तासांत मेहबूब लकीब मोहम्मद शेख (वय ४०, रा. जवळा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेत अटक केली.
⸻
निष्काळजीपणामुळे मृत्यूचा ठपका
पोलिसांच्या तपासात, गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी न नेत आरोपीने त्याला रस्त्यावर टाकून दिल्याचे स्पष्ट झाले. वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने मनोज विश्वकर्मा यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे.
या प्रकरणात आरोपीवर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
ठळक घडामोड
अपघातानंतर जखमीला मदत करण्याऐवजी त्याला दुसऱ्या ठिकाणी टाकून पळ काढणाऱ्या चालकाच्या अमानुष कृत्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वेळेत उपचार मिळाले असते तर एका तरुणाचा जीव वाचला असता, अशी खंत परिसरातून व्यक्त होत आहे.








