एफडीएच्या धडक कारवाईने मंचर हादरले; धसक्याने ५० हून अधिक पानटपऱ्या बंद


By, सुनिल घनवट

मंचर, ता. ६ (प्रतिनिधी) : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या धडक कारवाईचा परिणाम आता मंचर आणि आंबेगाव तालुक्यात स्पष्टपणे दिसून येत आहे. गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेमुळे अनेक पानटपरी चालकांनी दुकाने बंद ठेवण्यास प्राधान्य दिले आहे.

गेल्या आठवड्यात मंचर येथे एफडीएने केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल १० लाख ७९ हजार रुपयांचा प्रतिबंधित व संशयित साठा जप्त करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात असून, त्यानंतर व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

५० हून अधिक टपऱ्यांना कुलूप

मंचर शहर व परिसरात शंभरपेक्षा अधिक पानटपऱ्या कार्यरत आहेत. संभाव्य कारवाईच्या भीतीने त्यापैकी जवळपास ५० हून अधिक पानटपऱ्या मागील काही दिवसांपासून बंद असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील अनेक व्यावसायिकांनीही गुटखा व तत्सम पदार्थांचा साठा हटविल्याची माहिती समोर येत आहे.

नागरिकांकडून कारवाईचे स्वागत

आरोग्यास घातक ठरणाऱ्या पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. प्रतिबंधित पदार्थांमुळे तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात येत असल्याने अशा कारवाया सातत्याने व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोठ्या पुरवठादारांवर कारवाई कधी?

दुसरीकडे, अनेक वर्षांपासून खुलेआम सुरू असलेल्या प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीकडे यापूर्वी प्रभावीपणे दुर्लक्ष का झाले, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत. किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होत असताना या पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या मोठ्या घाऊक पुरवठादारांवर आणि साखळीतील प्रमुख घटकांवर कितपत कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपूर्ण साखळीवर कारवाईची मागणी

प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठा पूर्णपणे रोखण्यासाठी केवळ किरकोळ विक्रेत्यांवर नव्हे, तर उत्पादन, वाहतूक आणि घाऊक पुरवठा साखळीवरही कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

एफडीएच्या या धडक मोहिमेमुळे मंचरसह आंबेगाव तालुक्यातील पानटपरी व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या काही दिवसांत आणखी कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


20
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!