By, हनुमंत सुरवसे
लोणी काळभोर, ता. ६ : हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, लोणी काळभोर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. ५) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घरातील सर्व सदस्य घरी असताना संबंधित मुलगी अचानक बेपत्ता झाली. मुलगी दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र तिचा कोणताही मागमूस न लागल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही अज्ञात व्यक्तीने तिच्या अल्पवयीनपणाचा गैरफायदा घेत तिला पालकांच्या कायदेशीर ताब्यातून फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय आहे.या घटनेमुळे भोंडवेवाडी व आळंदी म्हातोबा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे पुढील तपास करीत आहेत. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके सक्रिय केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह अन्य तांत्रिक बाबींची तपासणी सुरू आहे.








