By, सुनिल घनवट
चाकण, ता. १५ : खेड तालुक्यातील सावरदरी येथे अफीम हा अंमली पदार्थ बाळगून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत सुमारे दोन लाख रुपये किमतीचे ३९६ ग्रॅम अफीम, एक दुचाकी व मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवरलाल सोनाराम जाट (वय ३४, रा. चाकण, मूळ राजस्थान) आणि महेंद्रसिंग चिमणाराम (वय २५, रा. सावरदरी) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मोहन धनाराम जाट (वय २२, रा. सावरदरी, मूळ राजस्थान) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी दुचाकीवरून अफीम घेऊन जात असताना पोलिसांच्या हाती लागले. चौकशीत हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे निष्पन्न झाले. सदर अफीम महेंद्रसिंग चिमणाराम याच्याकडून विक्रीसाठी आणण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई गोविंद डोके यांनी फिर्याद दिली असून, आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
महाळुंगे उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.








