मोहितेवाडीत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत तरुणावर हल्ला; आरोपी ताब्यात


By, राहुल बुट्टे

चाकण, ता. १५ : खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे पूर्वीच्या वादाच्या कारणावरून एका तरुणाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत मारहाण करून चाकूने जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यम कराळे (वय २५) हे मोहितेवाडी येथील पाटील गुळाचा चहा या दुकानासमोर पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी अनिल तुळशीराम पोतले (रा. मोहितेवाडी, ता. खेड) याने वाहनातून येऊन कराळे यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांची गचांडी पकडून मारहाण केली तसेच नखाने ओरखडे काढत चाकूने डोक्यावर व कपाळावर वार करून जखमी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या वडिलांसोबत झालेल्या पूर्वीच्या भांडणाचा तसेच चुलत्याच्या हत्येच्या घटनेचा राग मनात धरून आरोपीने हा हल्ला केला. यावेळी शिवीगाळ करत “गोळ्या घालून खल्लास करतो” अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सत्यम कराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल पोतले याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी सांगितले की, “घटनेचा अधिक तपास सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच काही साक्षीदारांची चौकशी करण्यात येत आहे.”

पुढील तपास चाकण उत्तर पोलीस करीत आहेत.


29
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!