By, Avishkar Fule
पुणे, ता. १२ : गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने आंबेगाव परिसरातील एका लॉजवर छापा टाकून वेश्याव्यवसायातून चार पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी एका एजंटला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावरील आंबेगाव बु. येथील “द्वारका लॉजिंग अॅण्ड बोर्डिंग”मध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने माहितीची पडताळणी केली. बनावट ग्राहकाच्या मदतीने खात्री करून पोलिसांनी लॉजवर अचानक छापा टाकला.
या कारवाईत लॉजमध्ये आणलेल्या चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच एजंट म्हणून काम करणाऱ्या सचिन बाबुराव गायकवाड (वय २८, रा. पानसरे नगर, कोंढवा, पुणे; मूळ रा. मुळज, ता. उमरगा, जि. लातूर) याला अटक करण्यात आली.
याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३ (१), (३), ३(५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार आंधळे, भिवरकर, केदार, कोंडे तसेच महिला पोलीस अंमलदार खेडेकर व इंगळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.








