थेऊरफाटा रेल्वे उड्डाणपुलावर भगदाड; जड वाहतुकीवर बंदीची शक्यता सभापती युवराज काकडे यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासन सतर्क


By, Avishkar Fule

लोणी काळभोर, ता. १२ : अष्टविनायक महामार्गावरील थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावर (ROB) पडलेल्या धोकादायक भगदाडामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने या मार्गावरील जड वाहतूक तात्पुरती बंद करण्याबाबत प्रशासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी या प्रकाराची तातडीने दखल घेत संबंधित विभागांकडे पाठपुरावा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक प्रशासनाने परिस्थिती गांभीर्याने घेतली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

लोणीकंद-थेऊरफाटा हा अष्टविनायक महामार्गावरील अत्यंत वर्दळीचा मार्ग मानला जातो. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात ट्रक, कंटेनर, मालवाहतूक वाहने तसेच प्रवासी वाहतूक सुरू असते. मात्र, उड्डाणपुलावर अचानक निर्माण झालेल्या खोल भगदाडामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच युवराज काकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पुलाच्या रस्त्याचा काही भाग खचल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने बॅरिकेट्स उभारण्याच्या सूचना दिल्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, विशेष रस्ते प्रकल्प विभाग आणि वाहतूक पोलिस प्रशासनाकडे लेखी निवेदन देत पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.

युवराज काकडे यांच्या पाठपुराव्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पंडित यांनी पुणे वाहतूक शाखेला अधिकृत पत्र पाठवले आहे. प्रत्यक्ष पाहणीत रस्त्याचा मोठा भाग खचल्याचे तसेच डांबरी रस्त्याखालील थर बाधित झाल्याचे स्पष्ट झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या पुलावरून वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, भगदाडाचा परिणाम केवळ डांबरी रस्त्यावर नसून पुलाच्या अंतर्गत संरचनेवरही झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जड वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्याचा विचार प्रशासन स्तरावर सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली. “वेळीच दुरुस्ती आणि तपासणी झाली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. पुलाच्या संपूर्ण सुरक्षिततेची तपासणी करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची दुरुस्ती आणि स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सभापती युवराज काकडे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्याने संभाव्य दुर्घटना टळल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!