By, सुनिल घनवट
राजगुरूनगर, ता. १३ : येलवाडी गावच्या हद्दीत हॉटेल इंद्रायणीसमोरील मोकळ्या जागेत किरकोळ वादातून तिघांवर लाकडी दांडके, वीट तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना (दि. ११) रात्री घडली. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोहीत इनामदार, सार्थक पाडळे, आशिष माने व सिद्धार्थ लांघे (सर्व रा. देहुगाव, ता. हवेली, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी आरोपी क्रमांक २, ३ व ४ यांना अटक करण्यात आली असून आरोपी क्रमांक १ फरार आहे.
दि. ११ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आकाश ढेरंगे व प्रशांत जाधव यांच्यात झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी, आकाश ढेरंगे व प्रसाद म्हस्के यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी लाकडी दांडके, वीट तसेच हाताने मारहाण करत फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पोटरीस व उजव्या पायाच्या नडगीस फ्रॅक्चर केले. तसेच आकाश ढेरंगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन चार टाके पडले, तर प्रसाद म्हस्के यांच्या पायालाही फ्रॅक्चर झाले.
हल्ल्यानंतर आरोपींनी हातातील दांडके हवेत फिरवत “आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला लागू नका,” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
जखमींवर उपचार सुरू असून प्रकृती सुधारल्यानंतर फिर्यादीने तक्रार दिली. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोउपनि जायभाये करीत आहेत.








