घरगुती वादातून संताप अनावर; सुनेला खोलीत कोंडून ८० वर्षीय सासूची चाकूने हत्या


By, Avishkar Fule

पुणे, ता. १३ : आंबेगाव बुद्रुक परिसरातील समृद्धी रेसिडेन्सी येथे घरगुती वादातून ८० वर्षीय महिलेची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

अनुपमा संजय शिंदे (वय ६०, रा. समृद्धी रेसिडेन्सी, एकता मित्र मंडळाजवळ, आंबेगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मल्लिकार्जुन कोळी यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भा.न्या.सं.क. कलम १०३ (१), १२७ (२) तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेएक ते अडीचच्या सुमारास समृद्धी रेसिडेन्सी येथील फ्लॅटमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. त्यावेळी आरोपी महिलेने तिच्या सुनेला बेडरूममध्ये कोंडून बाहेरून कडी लावल्याचा आरोप आहे. त्यानंतर सासू सुमन आण्णासाहेब शिंदे (वय ८०) यांच्यावर चाकूने हात व गळ्यावर वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या सुमन शिंदे यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक परदेशी पुढील तपास करीत आहेत.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!