By, Avishkar Fule
प्रतिनिधी | लोणी काळभोर
एचपी हिंदुस्तान पेट्रोलियमच्या लोणी काळभोर टर्मिनलमधून इंधन वाहतूक करणाऱ्या काही टँकरमधून डिझेल चोरी होत असल्याच्या चर्चेला आता अधिक गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत “ठळक घडामोड”कडून संबंधित माहिती व प्राथमिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, काही संशयित टँकर व ट्रान्सपोर्टर रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टँकरच्या मुख्य टाकीतून इंजिनला जाणाऱ्या छोट्या टाकीकडे गुप्त अंडर पाईपलाईन करून डिझेल वळवण्याचा प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही यंत्रणा इतक्या कौशल्याने तयार करण्यात आल्याची चर्चा आहे की, सामान्य तपासणीत हा प्रकार सहज लक्षात येत नाही. टँकर भरताना, खाली करताना किंवा भरून उभा असताना व्हॉल्व्हच्या मदतीने डिझेल चोरी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
याशिवाय ‘डीप पाईप’मध्ये बदल करून मोजमापात फेरफार केल्याचाही आरोप आहे. तपास दिशाभूल होण्यासाठी मूळ पाईपमध्ये छोटा तुकडा बसवून डिझेलचे प्रमाण लपवले जात असल्याची चर्चा ट्रान्सपोर्ट वर्तुळात सुरू आहे.
दोषी टँकर आणि ट्रान्सपोर्टरची नावे लवकरच उघड?
या संपूर्ण प्रकरणात सहभागी असल्याचा संशय असलेल्या काही टँकरचे नंबर, संबंधित ट्रान्सपोर्टर आणि चालकांची माहिती गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत या संदर्भातील मोठा खुलासा करणारी सविस्तर बातमी प्रसिद्ध केली जाणार आहे.
“वर्षानुवर्षे तेच ट्रान्सपोर्टर का?”
लोणी काळभोर टर्मिनलमध्ये काही मोजक्याच ट्रान्सपोर्ट कंपन्यांना सातत्याने काम दिले जात असल्याने कंपनीतील काही अधिकारी आणि ट्रान्सपोर्ट मालक यांच्यातील संबंधांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळेच अशा प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिक आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रात रंगू लागली आहे.
अचानक तपासणीची मागणी
या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित टँकरचे अचानक कॅलिब्रेशन, तांत्रिक तपासणी, गुप्त पाईपलाईन शोध मोहीम आणि स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दोषींवर कठोर कारवाई करून इंधन चोरीचे रॅकेट उघड करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.








