By, Hanumant Survase
पुणे : हडपसर परिसरातील कामधेनू स्टेटसमधील एका नामांकित रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर जिवंत बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने बुधवारी (ता. १३) सायंकाळच्या सुमारास परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच अनेकांनी तात्काळ पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस प्रशासनासह बॉम्बशोधक व नाशक पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. संशयित वस्तू अत्यंत काळजीपूर्वक ताब्यात घेत मोकळ्या जागेत हलविण्यात आली. त्यानंतर पथकाकडून तिची तपासणी व निष्क्रिय करण्याची प्रक्रिया नियंत्रित पद्धतीने पार पाडण्यात आली.
या संपूर्ण कारवाईदरम्यान परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आले असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली.
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संशयित वस्तू नेमकी काय होती आणि ती तेथे कोणी ठेवली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.








