येरवडा कारागृहातून पसार झालेला जन्मठेपेचा कैदी अटकेत खडक पोलिसांच्या सतर्कतेमुळे ४८ तासांत आरोपी जेरबंद


By, Avishkar Fule

पुणे, ता. १४ : येरवडा कारागृहातून पळून गेलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेचा आरोपी जनार्दन शंकर अडसुळे (वय ३५, रा. पीएमसी कॉलनी नं. १०, म्हसोबा मंदिराशेजारी, कासेवाडी, भवानी पेठ) याला खडक पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत ताब्यात घेतले. आरोपी हा खडक पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अडसुळे हा येरवडा खुले कारागृहातून १२ मे रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान कायदेशीर रखवालीतून पसार झाला होता. याप्रकरणी सुभेदार चंद्रकांत सयाजी खांदवे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. २२३/२०२६, बीएनएस कलम २६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस अंमलदार अनिकेत बाबर आणि उमेश मठपती यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. अडसुळे हा कासेवाडी परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ थांबला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचून १४ मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान अडसुळे याने २०१७ मधील खुनाच्या गुन्ह्यात २०२३ साली जन्मठेपेची शिक्षा झाल्याचे सांगितले. तसेच, आपल्या आत्याची प्रकृती गंभीर असल्याने तिला भेटण्यासाठी कोणालाही न सांगता खुले कारागृहातून पळून आल्याची कबुली दिली.

अडसुळे याच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. १०३/२०१७ अंतर्गत भादंवि कलम ३०२, १८२ अन्वये गुन्हा दाखल होता. सत्र प्रकरण क्रमांक ८०८/२०१७ मध्ये पुणे सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, उमेश मठपती, निलेश साबळे, अविनाश दळवी, सुहास डोंगरे, युवराज कांबळे, हेमंत पेरणे, महिला अंमलदार रुक्साना नदाफ व मयुरी जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!