By, Avishkar Fule
पुणे, ता. १९ : होळकरवाडी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हैदराबादमध्ये नाव बदलून लपून बसलेल्या आरोपीला फुरसुंगी पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. सचिन भास्कर पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होळकरवाडी येथील खोटेनगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला घरी एकटी असल्याची संधी साधून तिच्या मावसभाऊ असलेल्या सचिन पवार याने वारंवार अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास मुलगी व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ६४(२)(फ), (म), ३५१(२) तसेच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हैदराबाद येथे नाव बदलून राहत असल्याची माहिती मिळवली. आरोपी अत्तापूर परिसरातील गजबजलेल्या वस्तीत मोटारसायकल दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये काम करत असल्याचे समोर आले.
त्यानुसार पोलिस पथकाने हैदराबाद गाठून स्थानिकांकडून माहिती घेत आरोपीचा शोध घेतला. आरोपीने आपली ओळख लपवून वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अत्तापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
- ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह उपनिरीक्षक विनोद पवार, पोलिस हवालदार श्रीनाथ जाधव तसेच पोलिस अंमलदार हेमंत कामथे व सनी सोनवणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.









