By, Avishkar Fule
पुणे, ता. १९ : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुरंदर तालुक्यातील मांडकी येथे छापा टाकून सुमारे २८ लाख रुपयांचा चोरीचा चंदनसाठा जप्त केला. या कारवाईत ५६० किलो वजनाचे चंदनाचे ओंडके, बॅटरीवर चालणारा कटर आणि लोखंडी ड्रिल जप्त करण्यात आले आहेत.
पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार एटीएसचे पथक जेजुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत संशयित आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, वाल्हे येथे पथकाला मांडकी (ता. पुरंदर) येथील पाटील वस्ती परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीचे चंदन लपवून ठेवल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली.
त्यानुसार एटीएस व जेजुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विलास रावजी भोसले यांच्या शेतात छापा टाकला. शेतातील हिरव्या कापडाखाली लपवून ठेवलेले चंदनाचे कापलेले ओंडके पोलिसांना आढळून आले. यामध्ये ५६० किलो चंदन, झाडे कापण्यासाठी वापरला जाणारा बॅटरी कटर व दोन लोखंडी ड्रिल असा एकूण २८ लाख ५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत हा साठा भोसले यांचा भाचा प्रतिक प्रमोद खुंटे (रा. मांडकी, ता. पुरंदर) याने ठेवला असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो फरार असल्याचे समोर आले.
याप्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम २६, ४१, ४२ तसेच महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९८८ मधील कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, आरोपी प्रतिक खुंटे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सातारा जिल्ह्यात जबरी चोरीसह अन्य गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, जेजुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे तसेच एटीएसचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, पोलिस हवालदार निलेश कदम, रविंद्र जाधव, पोलिस अंमलदार मोसीन शेख, ओंकार शिंदे, जालिंदर मुळीक तसेच जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक केशव जगताप यांच्या पथकाने सहभाग घेतला.









