बारामतीत आंतरराज्यीय गांजा तस्करी रॅकेट उद्ध्वस्त सात आरोपी जेरबंद; ६३४ किलो गांजा, दोन इनोव्हा कारसह तीन कोटींचा मुद्देमाल


By, Tushar lavhe

बारामती : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरराज्यीय गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सात आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल ६३४ किलो गांजा, दोन इनोव्हा कार आणि इतर मुद्देमाल असा सुमारे ३ कोटी ३ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भारत सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

बारामती शहर पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०२६ मध्ये एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळोची-पिंपळी रोड परिसरातील शेतात दोन प्लास्टिक ड्रममध्ये ४७८ किलो गांजा साठवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व बारामती शहर पोलिसांची दोन विशेष पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली.

तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार समाधान गायकवाड व विकी उर्फ पप्पू कांबळे यांनी साथीदारांच्या मदतीने छत्तीसगड येथून गांजा आणून बारामतीत साठविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी प्रकाश उर्फ पक्या काटे, समाधान गायकवाड, प्रिन्सकुमार सिंग आणि राहुल गोरे यांना ताब्यात घेतले. चौकशीत आणखी आरोपींची नावे समोर आली.

दरम्यान, आरोपी पुन्हा गांजाचा साठा घेऊन बारामतीकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दोन इनोव्हा कारचा पाठलाग करत पोलिसांनी सांगली आणि बारामती येथे स्वतंत्र कारवाया केल्या. सांगलीतील एमआयडीसी कुपवाड परिसरात विकी उर्फ पप्पू कांबळे याला पकडण्यात आले. त्याच्या वाहनातून १३४ किलो गांजा जप्त करण्यात आला. तर बारामतीतील गवारे चौक परिसरात दुसऱ्या इनोव्हा कारवर कारवाई करत २३ किलो गांजासह तीन आरोपींना अटक करण्यात आली.

प्राथमिक तपासात आरोपी छत्तीसगडमधून गांजा आणून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूरसह विविध भागांत पुरवठा करत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे मोठे आंतरराज्यीय गांजा तस्करी रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, पोलीस अंमलदार अभिजीत एकशिंगे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, स्वप्निल अहीवळे, निलेश शिंदे, अजय घुले, रत्नदीप भंडारे, रामचंद्र शिंदे, सुलतान डांगे, अमोल शिंदे, उत्तम खाडे, यशवंत पवार, गिरीश नेवसे, अमोल देवकाते, अक्षय सिताप, विशाले शिंदे, सागर जामदार, बनसोडे आणि झणझणे यांनी पार पाडली.


20
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!