पुणे गुन्हे शाखेची धडक कारवाई तीन मोक्का गुन्ह्यांतील फरार आरोपी कोथरूडमधून जेरबंद


By, Avishkar Fule

पुणे, ता. २२ : पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-३ पथकाने तीन गंभीर मोक्का गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या फरार आरोपीला कोथरूड परिसरातून शिताफीने अटक केली. अभिजित उत्तम गोरडे (वय ३३, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, अशिष गार्डनजवळ, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गंभीर व मोक्का गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार संदीप शेळके, नितीन जगदाळे, बोडरे, तुपसौंदर, साठे, काटकर आणि वागस्कर यांचे पथक आरोपीचा शोध घेत होते.

दरम्यान, पोलीस अंमलदार संदीप शेळके आणि नितीन जगदाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत अभिजित गोरडे हा रात्रीच्या वेळी त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पथकाने कोथरूडमधील संत ज्ञानेश्वर कॉलनी परिसरात चारही बाजूंनी सापळा रचला. आरोपीला कोणतीही पळून जाण्याची संधी न देता घरातून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत गोरडे याचा कोथरूडमधील दोन तसेच वारजे परिसरातील एका गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात मोक्का तसेच शस्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपीला सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


20
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!