सहजपूर फाट्यावर रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात उमेश म्हेञे यांचे आमरण उपोषण सुरू


By, Suraj Jagtap

दौंड, ता. २६ : सहजपूर फाटा, नांदूर व खामगाव मार्गावरील रस्त्यांची झालेली दुरवस्था, गुडघाभर खड्डे तसेच साईडपट्ट्यांवरील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत, या मागणीसाठी सामाजिक-राजकीय कार्यकर्ते तथा महाराष्ट्र लोक काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष उमेशभैय्या म्हेञे यांनी सोमवार (दि.२५) दुपारी १२ वाजल्यापासून सहजपूर फाट्यावर आमरण उपोषण सुरू केले आहे.

यापूर्वी १३ मे रोजीही त्यांनी याच मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिल्यानंतर वैशालीताई नागवडे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तब्बल १२ दिवस उलटूनही एकही खड्डा बुजविण्यात आला नसल्याचा आरोप म्हेञे यांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कांबळे यांनी शुक्रवारी काम सुरू करण्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर संपर्क टाळत फोन ब्लॉक केल्याचा आरोपही म्हेञे यांनी केला. पुढे विभागातील खबाले सर यांच्याकडून संवाद साधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून, खड्ड्यांमुळे वारंवार अपघात घडत आहेत. शेतकरी, कामगार, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी तसेच उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हेञे यांनी नमूद केले.

मागण्या मान्य न झाल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्यात येणार असून, आमरण उपोषणासोबत मुंडण आंदोलन तसेच ‘PWD दशक्रिया विधी’ आंदोलनही करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!