विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरीप्रकरणी तिघांना अटक; ४८ गुन्ह्यांतील सराईत टोळी जेरबंद


By, Rahul Butte

चाकण, ता. २६ : चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, दोन गुन्ह्यांतील चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत ट्रान्सफॉर्मर चोरीचे तब्बल ४८ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मौजे बिरदवडी (ता. खेड) येथील गट क्रमांक १५३ मधील ‘नेक्सस व्हेन्चर्स’ या लेझर कटिंग वर्कशॉपमधील विद्युत ट्रान्सफॉर्मर १५ ते १६ मेदरम्यान चोरीला गेला होता. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ४३६/२०२६ नोंद करण्यात आला होता. तसेच, कृष्णाई खडी क्रश अँड वॉशिंग प्लांटमधील ट्रान्सफॉर्मर चोरीप्रकरणी गुन्हा क्रमांक २५५/२०२६ दाखल होता.

या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातून टोळीचा शोध घेत तीन आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रदीप राजेंद्र शिंदे (वय २६, रा. मेदणकरवाडी, चाकण), श्रीकांत शिवाजी जाधव (वय २४, रा. दहीवडी पारुडी, ता. शिरूर) आणि विशाल खंडू पवार (वय २८, रा. तांबेवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.

या आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, खेड, शिरूर, शिक्रापूर व यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रान्सफॉर्मर चोरीचे ४८ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलीस हवालदार ढमढेरे, कोळेकर, पोलीस शिपाई कोळी, लोखंडे व जगझाप यांनी ही कारवाई केली. पोलीस उपआयुक्त मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आतिष नरवडे करीत आहेत.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!