By, Avishkar Fule
लोणी काळभोर, ता. २७ : हवेली तालुक्यातील थेऊर येथील २१ वर्षीय सर्पमित्राचा साप पकडत असताना सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोलवडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (ता. २५) सायंकाळी घडली. दीपक संतोष जाधव (वय २१, रा. सिद्धेश्वर मंदिर रोड, काळे वस्ती, थेऊर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक जाधव हे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील विषारी व बिनविषारी साप विनामोबदला पकडण्याचे काम करत होते. परिसरात ते सक्रिय सर्पमित्र व गोरक्षक म्हणून परिचित होते. नागरिकांच्या घरात किंवा शेतात साप आढळल्यास दीपक यांना संपर्क केला जात असे. ते तातडीने घटनास्थळी जाऊन सापांना सुरक्षित पकडून निसर्गाच्या अधिवासात सोडत होते.
सोमवारी सायंकाळी कोलवडी परिसरात साप आढळल्याची माहिती दीपक यांना मिळाली होती. त्यानुसार ते घटनास्थळी पोहोचले. सापाचा शोध घेत असताना एका ठिकाणी पडलेल्या पत्र्यांच्या ढिगाऱ्याखाली साप लपल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी पत्र्याखाली हात घातला असता दबा धरून बसलेल्या सापाने त्यांच्या हाताला दंश केला.
सर्पदंश झाल्यानंतर उपस्थित नागरिक व मित्रांनी दीपक यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दीपक यांच्या निधनामुळे थेऊर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, धाडसी व मदतीला तत्पर असलेला सर्पमित्र गमावल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.








