शिंदवणे येथे हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त ४० हजारांचा मुद्देमाल जप्त; महिला आरोपी फरार


By, Avishkar Fule

उरूळी कांचन, ता. २९ : हवेली तालुक्यातील शिंदवणे येथील काळेशिवार परिसरात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर उरूळी कांचन पोलिसांनी छापा टाकून सुमारे ४० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत विषारी व आरोग्यास अपायकारक दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन, तयार गावठी दारू तसेच साहित्य जप्त करण्यात आले असून महिला आरोपी फरार झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २९) सकाळी साडेअकराच्या सुमारास शिंदवणे येथील कंजारभट वस्ती परिसरात गावठी हातभट्टीची दारू तयार होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता तमन्ना सनी चव्हाण (वय २०, रा. शिंदवणे, ता. हवेली) ही विषारी गावठी दारू तयार करत असल्याचे निदर्शनास आले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच ती घटनास्थळावरून पसार झाली.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ७५० लिटर कच्चे व जळके रसायन, २० लिटर तयार गावठी दारू, लोखंडी बॅरल, अॅल्युमिनियम झाकण, चाटू आदी साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४० हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलीस हवालदार शैलेश लोखंडे यांनी उरूळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून भारतीय न्याय संहिता कलम १२३ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ब), (क), (ई), (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक फौजदार सुनील सस्ते यांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब मत्रे करीत आहेत.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!