रात्री घरफोडी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक वाघोली पोलिसांची कारवाई ; सोन्या-चांदीसह २.५० लाखांचा मुद्देमाल जप्त


By, Avishkar Fule

पुणे, ता. २९ : वाघोली परिसरात रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना वाघोली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकी व मोबाईल असा सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे घरफोडी आणि वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

रोहित हनुमंत राक्षे (वय ३२, रा. टकलेनगर, शेवाळवाडी, मांजरी बुद्रुक, पुणे) आणि मनोज आनंद गायकवाड (वय २४, रा. सणसवाडी, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८७/२०२६ अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास सुरू होता. तपासादरम्यान पोलीस अंमलदार साईनाथ रोकडे आणि दिपक कोकरे यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्यांनी काळेचा ओढा, वाघोली परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडून ५.६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ७५.६२ ग्रॅम चांदीचे दागिने, एक दुचाकी आणि तीन मोबाईल फोन असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींकडून वाघोली पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक २९७/२०२६ मधील वाहनचोरीचाही गुन्हा उघडकीस आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, पोउपनिरीक्षक मनोज बागल तसेच पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे आणि गहिनाथ बोयणे यांनी केली.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!