By, Avishkar Fule
पुणे, ता. १ : अपहरण व खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात तब्बल नऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट-६च्या पथकाने हडपसर परिसरातून अटक केली. अमर बबन घाडगे (वय २९, रा. दीपकनगर, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग व राऊंड-अप ऑपरेशन राबविण्यात येत होते. यावेळी गुन्हे शाखा युनिट-६चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपी व अवैध शस्त्र तस्करीबाबत माहिती संकलन सुरू होते.
दरम्यान, पोलीस अंमलदार समीर पांडुळे व गणेश माने यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हडपसर पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये दाखल असलेल्या अपहरण व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अमर घाडगे हा लक्ष्मी कॉलनी परिसरात फिरत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ परिसरात सापळा रचला.
लक्ष्मी कॉलनी कॅनॉलजवळ, सोलापूर-पुणे महामार्गावर संशयित इसम आढळून आला. त्याची चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव अमर बबन घाडगे असल्याचे सांगितले. पुढील चौकशीत त्याने संबंधित गुन्हा इतर साथीदारांसह केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी हडपसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, सतीश वनवे, समीर पांडुळे, प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे, उमेश शेलार आणि अनिल जामगे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.








