शटर उचकटून चितळे बंधू, काका हलवाई दुकानात चोरी; दोन सराईत चोरटे जेरबंद


By, Avishkar Fule

पुणे, ता. १ : बाणेर रोडवरील चितळे बंधू व काका हलवाई या दुकानाचे शटर उचकटून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांचाही सहभाग तपासात निष्पन्न झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल २०२६ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास फॉर्च्युन हाऊस, रामइंदू पार्क, बाणेर रोड येथील चितळे बंधू व काका हलवाई दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यांनी लॉकरमधील सुमारे ६६ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरील तसेच शहरातील विविध भागांतील तब्बल २२५ हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. शिवाजीनगर, घोरपडी, हडपसर, रामटेकडी, आळंदी, नऱ्हे आणि आंबेगाव परिसरातील फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शिवम दत्ता अवचार (वय १९, रा. नऱ्हे) आणि करण शिवाजी जमादार (वय १९, रा. वडगाव बुद्रुक) अशी आहेत. दोघांवर खून, खुनाचा प्रयत्न आणि चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी वारंवार राहण्याची ठिकाणे बदलून पोलिसांपासून लपण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व विशेष कौशल्याच्या आधारे त्यांचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले.

आरोपींकडून होंडा शाईन व केटीएम ड्यूक २०० या दोन दुचाकी, आयफोन १६ मोबाईल, दोन लोखंडी पालघन, १२ हजार रुपये रोख रक्कम आणि कुबेर देवतेची प्रतिमा असलेला पिवळ्या धातूचा सिक्का असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश रायकर करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त चिलूमुला रजनीकांत आणि सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत व पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय खिल्लारे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. तपास पथकातील गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, अतुल इंगळे, प्रदीप खरात, शरद राऊत, गजानन अवतीरकर, स्वप्निल मराठे, गणेश भोईने, समीर पवार आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!