अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर पोलिसांचा छापा; १ लाख रुपयांहून अधिक किमतीच्या ८१ गॅस टाक्या जप्त


By, सुनिल घनवट

पिंपरी, दि. ३ जून : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर धडक कारवाई करत १ लाख ३०० रुपये किमतीच्या ८१ गॅस टाक्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग आढळून आला आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आयुक्तालय हद्दीतील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

d8914e8e-d3ac-4694-a02b-a82474fdc7d9

२ जून २०२६ रोजी पोलीस अंमलदार गणेश सावंत आणि विनोद वीर यांना उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खराबवाडी, चाकण-महाळुंगे रोड येथे असलेल्या ‘जय गणेश भारत गॅस’ या दुकानात अवैधरित्या गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे, पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश कोकणे, अमर कदम, विनोद वीर, गणेश सावंत आणि विशाल गायकवाड यांनी घटनास्थळी छापा टाकला.

छाप्यात आरोपी सचिन प्रकाश म्हस्करे (वय ३१, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) हा एका विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून इतर सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचे आढळून आले. कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता ज्वलनशील गॅसचे रिफिलिंग करण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत होता, असे पोलिसांनी सांगितले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एकूण ८१ गॅस टाक्या जप्त केल्या. जप्त मुद्देमालाची किंमत १ लाख ३०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८, जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे करत आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे तसेच पोलीस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश कोकणे, विशाल गायकवाड, विनोद वीर, गणेश सावंत, अमर कदम आणि गणेश हिंगे यांनी सहभाग घेतला.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!