वाघोलीत ब्राऊन शुगर व पॉपी स्ट्रॉसह राजस्थानातील आरोपी जेरबंद; ११.४० लाखांचा मुद्देमाल जप्त


By, Avishkar Fule

पुणे, दि. ३ जून : वाघोली पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत ब्राऊन शुगर (हेरॉईन) आणि पॉपी स्ट्रॉ (डोडाचुरा) विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत एकूण ११ लाख ४० हजार ७०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे तपास पथक गुन्हे प्रतिबंध आणि अवैध धंद्यांवर कारवाईसाठी केसनंद रोड परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी जोगेश्वरी विद्यालयाजवळील बसस्टॉप परिसरात एक संशयित व्यक्ती आढळून आली. पोलिसांनी त्याला हटकले असता तो पळून जाण्याच्या तयारीत असल्याने त्याच्यावर संशय बळावला.

सहाय्यक फौजदार बाबासाहेब मोराळे, पोलीस अंमलदार अशोक शेळके व सुनील कुसाळकर यांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने आपले नाव शिव कालू सिंह (वय ३३), रा. बालाजीनगर, केसनंद रोड, वाघोली, पुणे (मूळ रा. जोधपूर, राजस्थान) असे सांगितले.

आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ३२ ग्रॅम ५४० मिली वजनाची ब्राऊन शुगर (हेरॉईन) जप्त करण्यात आली. या अंमली पदार्थाची किंमत ११ लाख ३८ हजार ९०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६४/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २१(ब) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता १२० ग्रॅम २८० मिली वजनाचा पॉपी स्ट्रॉ (डोडाचुरा) हा अंमली पदार्थ आढळून आला. त्याची किंमत १ हजार ८०४ रुपये असून तोही जप्त करण्यात आला. त्यामुळे आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम १५(अ) ची वाढ करण्यात आली आहे.

या कारवाईत पोलिसांनी एकूण ११ लाख ४० हजार ७०४ रुपयांचा ब्राऊन शुगर व पॉपी स्ट्रॉ असा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, पोउपनि मनोज बागल तसेच बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे आणि गहिनाथ बोयणे यांनी सहभाग घेतला.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!