By, सुरज जगताप
शिरूर, : वडीलोपार्जित शेतजमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून चांडोह (ता. शिरूर) येथे दोन भावकींमध्ये झालेल्या तुफान मारामारीत १९ जण जखमी झाले. दगडफेक, लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडचा वापर करून झालेल्या या संघर्षामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील एकूण ५२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शनिवारी (ता. ३०) सकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांडोह येथील सालकर कुटुंबीयांच्या गट क्रमांक ४४ मधील वडीलोपार्जित शेतजमिनीच्या हक्कावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. याच वादाचे शनिवारी हिंसक रूपांतर झाले.
चंद्रकांत सखाराम सालकर (वय ५८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या भावकीतील काही जण ट्रॅक्टर, पिकअप, छोटा हत्ती आणि अन्य वाहनांमधून शेतात आले. त्यांनी गवारीच्या पिकात ट्रॅक्टर घालून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत जाब विचारल्यानंतर संबंधितांनी लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दुसरीकडे, कैलास धोंडीभाऊ सालकर (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते त्यांच्या वडीलोपार्जित जमिनीत नांगरणीसाठी गेले असता दुसऱ्या गटातील लोकांनी त्यांना जमिनीत येण्यास मज्जाव केला. त्यानंतर लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या मारामारीत दोन्ही गटांतील महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर सदस्य जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
दोन्ही गटांच्या फिर्यादींवरून गुन्हे
दोन्ही बाजूंनी दिलेल्या फिर्यादींवरून बेकायदा जमाव जमविणे, मारामारी करणे आणि सामाजिक शांततेचा भंग करणे आदी कलमांन्वये शिरूर पोलिसांनी एकूण ५२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
गावात पोलिस बंदोबस्त
घटनेनंतर चांडोह परिसरात तणाव निर्माण झाला असून, वादग्रस्त जमिनीच्या परिसरात तसेच संबंधितांच्या घरांजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे आणि उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही गटांनी शांतता राखून समन्वयाने मार्ग काढावा आणि कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार गोपीनाथ चव्हाण करीत आहेत.








