By, Avishkar Fule
पुणे : शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर कॅन, ड्रम किंवा इतर कंटेनरमध्ये डिझेल विक्रीवर निर्बंध घालण्यात आल्याने शेतकरी, व्यावसायिक आणि वाहनचालकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नसला, तरी अनेक पंप चालकांनी कॅनमध्ये डिझेल देणे बंद केले असून काही ठिकाणी ओळखपत्र, लेखी अर्ज तसेच इतर कागदपत्रांची अट घालण्यात आली आहे.
पेट्रोल पंपांवर वाहनाशिवाय कॅन किंवा ड्रममध्ये डिझेल घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनेक पंपांनी अशा प्रकारच्या विक्रीवर निर्बंध आणल्याचे दिसून येत आहे. डिझेलचा साठा करून होणारा अवैध वापर, काळाबाजार, चोरी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उद्भवणारे धोके टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या निर्बंधांचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकरी, बांधकाम प्रकल्पांवरील जनरेटर चालक, पाणी उपसा करणाऱ्या मोटारींचे मालक तसेच रस्ते बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्री चालकांना बसत आहे. अनेक यंत्रे पेट्रोल पंपांपासून दूरस्थ भागात कार्यरत असल्याने ती थेट पंपावर आणणे शक्य नसते. त्यामुळे कॅनमध्ये डिझेल नेण्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र नव्या निर्बंधांमुळे अनेकांची कामे खोळंबत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
काही वाहनचालकांनीही या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कोणताही स्पष्ट सरकारी आदेश नसताना पंप चालकांकडून वेगवेगळे नियम लागू केले जात असल्याने संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पेट्रोल पंप चालकांनी मात्र सुरक्षेच्या कारणास्तव नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. “डिझेलचा गैरवापर आणि सुरक्षेचे प्रश्न लक्षात घेऊन आम्हाला नियमांचे पालन करावे लागते. संबंधित यंत्रणा आणि तेल कंपन्यांकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांनुसारच कॅनमध्ये इंधन देण्याबाबत निर्णय घेतला जातो. ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक कागदपत्रे असल्यास काही प्रकरणांत परवानगी दिली जाते,” असे एका पेट्रोल पंप चालकाने सांगितले.
कॅनमध्ये डिझेल विक्रीबाबत स्पष्ट धोरण जाहीर करण्याची मागणी आता विविध व्यावसायिक आणि ग्राहकांकडून केली जात आहे. त्यामुळे सुरक्षेचे नियम आणि ग्राहकांची गरज यामध्ये समतोल साधला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








