By, Avishkar Fule
पाली, ता. ५ (वार्ताहर) : कोकणातून पुण्याकडे कारने प्रवास करणारा एक प्रवासी ताम्हिणी घाटात शौचासाठी थांबल्यानंतर अंधारात खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ५) पहाटे दोनच्या सुमारास घडली. ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉईंट परिसरात झालेल्या या अपघातात संबंधित व्यक्तीच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून शरीरावर अन्य ठिकाणीही दुखापती झाल्या आहेत. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, स्थानिक बचाव पथक आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती आपल्या मुलासह चिपळूणहून पुण्याकडे कारने निघाले होते. ताम्हिणी घाटात आल्यानंतर शौचास लागल्याने त्यांनी वाहन वॉटरफॉल पॉईंटजवळ थांबविले. परिसरात प्रचंड अंधार असल्याने दरीचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते खोल दरीत कोसळले.

वडील अचानक नजरेआड झाल्याने आणि दरीतून आवाज येत असल्याने मुलगा घाबरला. त्याने तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या आपत्कालीन बचाव पथकाचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले.
पहाटेच्या अंधारात आणि अवघड भौगोलिक परिस्थितीत बचावकार्य राबविण्याचे मोठे आव्हान होते. मात्र, रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी आवश्यक साहित्याच्या मदतीने दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली. सुमारे ४५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर जखमी व्यक्तीचा शोध घेण्यात यश आले आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
अपघातात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून शरीराच्या इतर भागांनाही दुखापती झाल्या आहेत. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.








