वाघोलीत विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा


By, Avishkar Fule

वाघोली, ता. हवेली : पत्नीला पैशांसाठी सतत त्रास देत शारीरिक व मानसिक छळ केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप करत वाघोली पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गणेश कांबळे (वय २५, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. हडको, जि. नांदेड) यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांच्या आई अनिता वाघमारे (वय ४५, रा. भोला नगर, आदर्श चाळ, कलवा, ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, प्रियंका यांचा पती गणेश दिगंबर कांबळे (वय ३०, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. हडको, जि. नांदेड) हा सतत पैशांची मागणी करत होता. तसेच त्याने पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण केल्याचा आरोप आहे. या छळामुळे प्रियंका यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हा प्रकार २१ ऑगस्ट २०२५ ते १ जून २०२६ या कालावधीत वाघोली येथे घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०८, ११५(२) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे करीत आहेत.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!