By, सुनिल घनवट
घोडेगाव, ता. ५ : आंबेगाव तालुक्यातील गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) मुलांच्या वसतिगृहात जुन्या वादातून २३ वर्षीय तरुणाचा सिमेंटचा गट्टू आणि लोखंडी पाईपने डोके ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. घोडेगाव पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांतच आरोपीला अटक केली आहे.
सौरव संतोष साखरे (वय २३, सध्या रा. गोनवडी आयटीआय वसतिगृह, मूळ रा. चिंचपूरगाव, ता. किल्लेधारूर, जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अमय भिका कोकरे (वय १९, सध्या रा. गोनवडी आयटीआय वसतिगृह, मूळ रा. पारवा, ता. पुसद, जि. यवतमाळ) याला पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी मृत सौरवचा मित्र ऋषिकेश लक्ष्मण बढेकर याने घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी रात्री सौरव साखरे आणि त्याचा मित्र ऋषिकेश बढेकर हे वसतिगृहाच्या टेरेसवर झोपले होते. रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास आरोपी अमय कोकरे हा तेथे आला. यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याने सौरवला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर संतापाच्या भरात अमयने जवळच असलेल्या सिमेंटच्या गट्टूने आणि लोखंडी पाईपने सौरवच्या डोक्यावर वार केले. हल्ला इतका भीषण होता की गंभीर दुखापतीमुळे सौरवचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे आणि घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची चौकशी करून तपासाची सूत्रे वेगाने हलवली. त्यानंतर संशयित अमय कोकरे याला काही तासांत ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
आरोपीविरुद्ध घोडेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सागर पवार व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.








