By, राहुल बुट्टे
घोडेगाव, ता. ५ : आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक येथील वालकोळीवाडी परिसरात विवाहितेला व तिच्या दोन लहान मुलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी घोडेगाव पोलिसांनी पती आणि दिराला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्विनी तानाजी वालकोळी (वय २८), अक्षिदा तानाजी वालकोळी (वय ५) आणि कार्तिक तानाजी वालकोळी (वय ३, सर्व रा. वालकोळीवाडी, गोहे बुद्रुक) यांचा ३ जून रोजी गावातील सार्वजनिक विहिरीत बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुरुवातीला आत्महत्येची नोंद करण्यात आली होती.
तपासादरम्यान आणि ४ जून रोजी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, कौटुंबिक कारणांवरून आश्विनी वालकोळी यांना पती, सासू, दिर आणि जाऊ यांच्याकडून वारंवार मारहाण, शिवीगाळ व मानसिक त्रास दिला जात होता. तसेच तिच्या मुलांनाही त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून आश्विनी यांनी मुलगी अक्षिदा आणि मुलगा कार्तिक यांच्यासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात पती तानाजी शंकर वालकोळी, सासू सिताबाई शंकर वालकोळी, दिर शिवाजी शंकर वालकोळी आणि जाऊ सुनिता शिवाजी वालकोळी (सर्व रा. वालकोळीवाडी, गोहे बुद्रुक) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडेगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पती तानाजी वालकोळी आणि दिर शिवाजी वालकोळी यांना अटक केली आहे. तर सासू आणि जाऊ यांच्या अटकेसंदर्भात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.








