खराडीत १३ किलो ८० ग्रॅम पॉपी स्ट्रासह आरोपी जेरबंद; २.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त


By, Avishkar Fule

पुणे, ता. ७ : पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने खराडी परिसरात कारवाई करत १३ किलो ८० ग्रॅम पॉपी स्ट्रा (अफू) या अंमली पदार्थासह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत २ लाख ६१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ जून २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक खराडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी खराडकर पार्क, थिटे वस्ती, साईकृपा बिल्डिंगसमोर रस्त्याच्या कडेला एक इसम दोन गोण्या घेऊन संशयास्पदरीत्या उभा असल्याचे पोलीस अंमलदारांना दिसून आले.

संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्याची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान मुकेश बिश्णोई (वय ३०, रा. खराडकर पार्क, थिटे वस्ती, खराडी, पुणे) याच्या ताब्यातील गोण्यांमधून १३ किलो ८० ग्रॅम पॉपी स्ट्रा (अफू) हा अंमली पदार्थ आढळून आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९७/२०२६ नुसार एनडीपीएस कायदा कलम ८(क) व १५(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.


20
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!