By, Tushar lavhe
सुपा, ता. ७ : पत्नीला मेसेज पाठवत असल्याच्या संशयातून २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याचे अपहरण करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सुपा परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सुपा पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
जखमी तरुणाचे नाव ऋषिकेश विजय चांदगुडे (रा. दंडवाडी, ता. बारामती) असे असून, ओंकार प्रकाश भोसले व तन्मेष सुधीर साळुंखे (दोघे रा. बारामती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ६) सायंकाळी आरोपींनी ऋषिकेश याला सुपा-मोरगाव मार्गावरील चतुर्थी हॉटेल परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर फॉरेस्ट गेट परिसरात त्याला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने कारमध्ये बसविण्यात आले. आरोपींनी त्याचे अपहरण करून पुण्याच्या दिशेने नेले.
प्रवासादरम्यान आरोपींनी ऋषिकेश याच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. वार चुकविताना चाकू त्याच्या डाव्या भुवईजवळ लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी त्याला दिवे घाटाच्या पायथ्याशी नेऊन मारहाण केली.
मात्र, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ऋषिकेश याने आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यानंतर मित्रांच्या मदतीने त्याने पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.
या प्रकरणी सहाय्यक फौजदार जगताप यांनी फिर्याद दिली असून, सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले आहे.








