क्षणात होत्याचे नव्हते! नीरा-मोरगाव मार्गावर भीषण अपघात; दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू, ९ वर्षीय भाऊ गंभीर


By, Tushar lavhe

वडगाव निंबाळकर, प्रतिनिधी : नीरा-मोरगाव राज्यमार्गावरील चौधरवाडी फाटा (ता. बारामती) येथे शनिवारी (दि. ६) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा ९ वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत मुलींची नावे सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय १७) आणि अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (वय १५, रा. बोडरेवस्ती, ता. फलटण) अशी आहेत. तर पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय ९) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बोडरे कुटुंबातील ही तिन्ही भावंडे मुर्टी येथे मामाकडे धोंडे जेवणासाठी जात होती. त्यावेळी मोरगावहून नीरेकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने (क्र. डीडी १ जी ९३४३) चौधरवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की दुचाकी काही अंतर फरफटत गेली. या अपघातात सेजल व अक्षरा यांचा जागीच मृत्यू झाला, तर पवन गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क नागरिकांनी पाठलाग करून चालक मुकेश मेघवाल याला पकडून वडगाव निंबाळकर पोलिसांच्या ताब्यात दिले.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, चौधरवाडी फाटा परिसरात वारंवार अपघात होत असल्याने या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक प्रदीप भापकर यांनी केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे फलटण व बारामती परिसरात शोककळा पसरली आहे.


20
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!